तमिळमध्ये मराठी माणूस सुपरस्टार आहे पण मराठीत असा एकही सुपरस्टार का नाही
जेव्हा "सैराट" आला आणि मराठीत सर्वात जास्त ११० कोटी कमाई करणारा चित्रपट ठरला तेव्हा वाटलेलं की "आकाश ठोसर" हा पुढे सुपरस्टार म्हणून ओळखला जाईल,पण आज तो कुठे गेला कोणाला पत्ताच नाही
मराठीत एक काळ असा होता जेव्हा "दादा कोंडके' यांचे चित्रपट प्रदर्शित झाले की राज कपूर सारखे निर्माते पण घाबरत होते की हिंदी चित्रपट आता दादांच्या चित्रपटासोबत प्रदर्शित केले तर लोक पाहणार नाहीत,दादा कोंडके हे एकमेव असे मराठी "सुपरस्टार" होऊन गेलेत ज्यांच्यावर सतत नऊ चित्रपट सुपरहिट झाल्याने "गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड" आहे,पण त्यानंतर असा एकही मराठी सुपरस्टार नाही झाला.
तमिळ सुपरस्टार "रजनीकांत" यांचे खरे नाव आहे "शिवाजीराव गायकवाड",अनेक लोकांना हे अजून माहीत नसेल,पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक मराठी माणूस तमिळनाडूत जातो आणि तिथला सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून उदयास येतो,या देशात चित्रपट मराठी माणसाने सुरू करून सुद्धा स्वतःच्या राज्यात मराठी चित्रपट चालेनात,मराठी निर्माते कोणाच्या भरवश्यावर चित्रपट निर्मिती करतील हा मोठा प्रश्न आहे ?
मुळात सुपरस्टार म्हणजे कोण ज्याचे लाखो कोटी चाहते असतात,आणि हे चाहते त्याचे चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात,पण दुर्दैवाने मराठीत असा चाहतावर्ग कुठेच पहायला मिळत नाही,या परिस्थितीला सर्वात मोठे कारण दिसते ते म्हणजे बॉलिवूड,पूर्वीपासून मराठी जनतेने हिंदी नटांना जास्त महत्व दिले आज रितेश देशमुख पण मराठी लोकांना यासाठी आवडतो कारण त्यांनी आधी हिंदीत काम केलेत,विचार करा जर रितेश देशमुखने हिंदीच्या ऐवजी केवळ मराठीत पदार्पण केले असते तर त्यांचा एव्हढा मोठा चाहता वर्ग झाला नसता,अनेक वर्षे हिंदीत काम करून मग ते मराठीत आले, हिंदीत काम केल्याने रितेश देशमुख यांचे हिंदीसह इतर भाषिक देखील मोठ्या प्रमाणात चाहते असल्याने त्यांना मराठीत एक वेगळा महत्व मिळतो,रितेश देशमुख यांचे पण सगळे चित्रपट सुपरहिट आहेत "लै भारी" पासून ते "वेड" पर्यंत यशस्वी चित्रपट आहेत आणि मराठीत एकही चित्रपट फ्लॉप झाला नाही पण सुपरस्टारला जो एक वलय प्राप्त असतो तसा अजून पहायला मात्र मिळत नाही.
तमिळमधील सुपरस्टार रजनीकांत, तेलुगूमधील सुपरस्टार अल्लू अर्जुन इत्यादी प्रमाणे मराठीत अजून मोठा सुपरस्टार कोणी होईल असे सद्या तरी वाटत नाही,कारण एक तर मराठी चित्रपट चालत नाहीत,शो मिळत नाही असे अनेक कारणे राज्यात आहेत, खासकरून हिंदी चित्रपट पाहणारे मराठी लोक मराठी नटांना पूर्वीपासून कमी लेखत आलेत,हिंदीत काम करणारे म्हणजे दर्जेदार मराठीत काम करणारे म्हणजे कमी दर्जा किंवा डाऊन मार्केट ही समज जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मराठीत असा मोठा सुपरस्टार होणे अशक्य आहे.
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners
Comments
Post a Comment